आमच्या बद्दल

शिवगर्जना प्रतिष्ठान बद्दल

" शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे, शास्त्र चिंता प्रवर्तते " अर्थात शस्त्रांनी रक्षिलेल्या राष्ट्रातच शास्त्रांचे चिंतन होते. संघर्षाशिवाय शांती प्रस्थापित करता येत नाही. महाभारतातील कृष्णनीती, मौर्य काळातील कौटिल्याची अर्थनीती हेच सांगते. शिवकाळ तर याचे ताजे उदाहरण म्हणता येईल. युद्धनीतीचे अनेक पैलू महान सेनानी शिवरायांच्या रणनीती मधून उलगडतात. प्राचीन काळापासूनच भारतात युद्धकला इतर कलेप्रमाणे शिखरावर होती. भारतभूमीतून युद्धकलेचा प्रचार आणि प्रसार जगभर झाला. मूळ भारतीय युद्धकला त्या त्या प्रांतातील स्थानिक संस्कारानुसार बदल करत गेली आणि मूळ अस्तित्वाला धक्का न लावता नव्यारूपाने समोर आली. शिवगर्जना प्रतिष्ठान,ठाणे ही संस्था २०१० पासून महाराष्ट्रात भारतीय युद्धकलेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करीत आहे. मुंबई विभागातील अनेक ठिकाणी भारतीय युद्धकला शिबिरांचे आयोजन करणे, शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच समाजातील विविध स्तरावर ऐतिहासिक नाणी आणि शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करून " युद्धकला आणि ऐतिहासिक वारसाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे कार्य अविरत सुरू आहे. संस्थेतर्फे " गडकोट अभ्यास मोहीम ", " शौर्यगाथा युद्धभूमींची ", " ठाणे हेरिटेज वॉक " यांसारखे कार्यक्रम आयोजित करून आजच्या तरुण पिढीला आपल्या वारसाबद्दल माहिती देताना तो जतन करण्यासाठी प्रोत्साहित करणे. मुंबई विभागात युद्धकला प्रशिक्षण केंद्र सुरू करून आपल्या तरुण पिढीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ करण्याचे कार्य संस्थेकडून सुरू असून आपण ही आपल्या विभागात हे केंद्र स्थापन करून सामाजिक कार्यात सहभाग देऊ शकता.